मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस   

मुंबई : मुंबई आणि उपनगरात पावसाने मंगळवारी थोडीशी विश्रांती घेतली. मात्र, २४ तासांत १०६ मिमी पाऊस पडला, असे हवामान खात्याने सांगितले. उपनगरीय गाड्यांसह सार्वजनिक वाहतूक काल संथ गतीने सुरु होती. बस, मेट्रो सेवा पूर्ववत झाली, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
 
२५ मे रोजी रात्री १० ते २६ मे रोजी सकाळी ११ पर्यंत नरिमन पॉइंट परिसरात सर्वाधिक २५२ मिमी पाऊस पडला. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) मुख्यालय (२१६ मिमी) आणि कुलाबा पंपिंग स्टेशन (२०७ मिमी) येथे पाऊस पडला.
 
मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत मुंबईत १०६ मिमी पाऊस पडला. पश्चिम उपनगरात ७२ मिमी आणि पूर्व उपनगरात ६३ मिमी पाऊस पडला, असे बीएमसीने सांगितले.
 
पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहील. तसेच, मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.
 
मुंबईत यंदा मान्सून ७५ वर्षांनंतर प्रथमच लवकर दाखल झाला आहे. सोमवारी मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे दक्षिण मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागांत पाणी साचले होते. तर झाडे आणि फांद्या पडण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. उपनगरीय रेल्वेसह मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. 

झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंबईत झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला, अशी माहिती मंगळवारी महापालिका प्रशासनाने दिली.मागील दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील गणेश मैदानाजवळ झाड कोसळल्याने तेजस नाईक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाजवळ झाडाची फांदी पडल्याने साईराज पवार (वय-२४) जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
सोमवारी मुंबईत झाडे किंवा फांद्या पडण्याच्या किमान ७० घटना घडल्या, असे अधिकार्‍यांनी सांगितले. तर, उपनगरात ४६ घटना घडल्या. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासांत शहरात शॉर्ट सर्किटच्या ५३ घटना घडल्या. तर, घर किंवा भिंत कोसळण्याच्या १२ घटना घडल्या. सुदैवाने, यात कोणीही जखमी झाले नाही.
 

Related Articles